पणजी - गोवा सरकारने जनता कर्फ्यु बुधवारच्या (दि. 25 मार्च) मध्यरात्रीपर्यंत सलग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अत्याश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सरकारी आणि खासगी आस्थापने बंद ठेवली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोमंतकीय जनता कर्फ्युला प्रतिसाद देत रस्त्यावर येण्याचे टाळले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले असून पुढील तीन दिवस वाढविण्यात येणाऱ्या जनता कर्फ्युला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, शेजारील राज्यांच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याबरोबरच विमानतळावर ठराविक विमान उतरत असून प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. आवश्यकता भासल्यास क्वारंटाईन केले जात आहे. त्याबरोबरच अन्य राज्यांतून मागील तीन-चार दिवसांत गोव्यात परतलेल्या विद्यार्थी तसेच चाकरमान्यांनी आपली तपासणी करून घ्यावी. वृत्तपत्र छपाई करूनही लोकांपर्यंत पोहोचणे कठीण आहे. तसेच कागद विषाणू वाहक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुद्रीत माध्यमांनी वृत्तपत्रे कागदाऐवजी समाजमाध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित करुन जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
हेही वाचा - "पर्यटकांना भाड्याने दिल्या जाणाऱ्या गाड्यांचे परवाने आजपासून निलंबित"