श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनागचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अब्दुल जब्बार यांना मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बुरहान वाणी याला कंठस्नान घालणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले होते. जब्बार हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एकूण 409 शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये जब्बार यांना स्थान मिळाले आहे.
जब्बार हे बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. सध्या ते केंद्र सरकारच्या (इंटेलिजन्स ब्युरो) या संस्थेत प्रतिनियुक्तिवर आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक हे शौर्यसाठी दिले जाणारे सर्वोच्च पोलीस पदक आहे. यावर्षी जब्बार यांच्यासोबतच जम्मू काश्मिरातील आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. यावर्षी जम्मू काश्मिरातील सर्वाधिक 108 पोलीस अधिकाऱ्यांना हा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हेही वाचा - जम्मू काश्मीरमध्ये डौलाने फडकला तिरंगा, आर्टिकल ३७० हटवल्यानंतर पहिला प्रजासत्ताक दिन साजरा
8 जुलै 2016 रोजी एका इंटलिजन्स इनपुटवर काम करत अनंतनागचे तत्कालीन एसएसपी अब्दुल जब्बार यांनी अतिरेकी बुरहान वाणीला ठार मारणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले होते. मात्र, या कारवाईनंतर आयपीएस अधिकारी जब्बार यांची जम्मू काश्मीरच्या बाहेर नेमणूक झाली. वाणी हा दहशतवादी संघटनेचा काश्मिरमधील पोस्टर बॉय होता. समाजमाध्यमांवरही सक्रिय होता. तसेच वेगवेगळ्या शस्त्रांसह स्वत:ची छायाचित्रे समाजमाध्यमांवर अपलोड करत असे. यातून तो इतरांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी आकर्षित करत होता आणि इतर दहशतवाद्यांना विघातक कृत्ये करण्यास प्रोत्साहन देत होता.
पोलिसांच्या या कारवाईनंतर तब्बल सहा महिने काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या तणावातून झालेल्या चकमकींमध्ये 100 हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला होता.