लखनौ : भारत- नेपाळ सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (कायदा सुव्यवस्था) राज्यातील सात जिल्ह्याना हाय अलर्ट जारी केला आहे. बिहारच्या सीमामढी जिल्ह्यातील भागात नेपाळच्या सीमा सुरक्षा मदभेदानंतर गोळीबार केल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराजगंज, सिद्धार्थनगर, श्रावस्ती, बलरापूर, बहारिच, लखिमपूर, खेरी आणि पिलीभित जिल्ह्यांध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. नेपाळने लिपूलेक, लिंपियाधूरा, आणि कालापाणी या भारताच्या भूप्रदेशावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सध्या सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर नेपाळचे लष्कर नारायनपूर भागात जोरदार पेट्रोलिंग करत आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिपूलेक खिंड आणि धारचुला या दोन ठिकाणांना जोडणारा महत्त्वाचा 80 किमी लांब रोडचे उद्धाटन केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
नेपाळच्या संसदेत सीमा वाढविण्याचा कायदा मंजूर
लिपूलेक, लिंपियाधूरा, आणि कालापाणी हा प्रदेश भारतीय सीमेंतर्गत येतो. मात्र, नेपाळच्या संसदेने शनिवारी (13 जून) राज्यघटना दुरुस्ती केली आहे. त्यानुसार हे प्रदेश नेपाळच्या नकाशात समाविष्ट करण्यात आले आहेत. या भाग रणनितीक दृष्या भारतासाठी महत्त्वाचा आहे. कृत्रिमरित्या सीमा वाढवण्याचा प्रकार भारत कधीही मान्य करणार नाही, असा इशारा भारतीय दुतावासाकडून देण्यात आला आहे. भारत आणि नेपाळमध्ये कायमच चांगले संबध राहीले असून पुढेही मजबूत संबध राहतील, असे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी म्हटले आहे.