नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 38 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 439 झाला आहे, यात 9 हजार 756 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 1 हजार 306 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 377 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 2 हजार 687 कोरोनाबाधित असून 178 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 204 कोरोनाबाधित असून 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 1 हजार 561 कोरोनाबाधित तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसांत एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.
दरम्यान जगभरातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आत्तापर्यंत विविध देशांत तब्बल 1 लाख 26 हजार नागरिक दगावले आहेत. अशा कठीण परिस्थितीतही दिलासादायक बातमी म्हणजे 4 लाख 78 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.