लडाख - भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लेहमध्ये गस्त वाढवली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या आठवड्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर लेहमध्ये भारताकडून लढाऊ विमानांची गस्त वाढविण्यात आली आहे.
भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हाणामारीत चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत, असे सांगितले जाते. मागील कित्येक दिवसांपासून भारत व चीनमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रदेशावरून तणाव आहे. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात चर्चाही झाली होती. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक चकमक झाली. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले.