नवी दिल्ली - कोरोना संकट संपल्यानंतर जागतिक व्यवस्था पूर्णपणे वेगळी असेल. यावेळी दहशतवादाला पाठिंबा देण्याची भूमिका बदलणे पाकिस्तानच्याच हिताचे असेल. तसेच अशा देशांशी कसे वागावे, हे भारताला चांगलेच माहित आहे, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले.
कोरोनाविरोधातील लढाईत पंतप्रधान मोदींना सर्व समुदायांचे समर्थन प्राप्त आहे. 'मोदी-फोबिया'ने ग्रस्त असेलेल लोक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे कोरोनाच फैलाव झाला. मात्र, यासाठी काही सदस्यांच्या चुकांबद्दल संपूर्ण समाजाला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, असे राम माधव म्हणाले.
संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या समस्येवर मात करण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, पाकिस्तान भारतविरोधी आणि दहशतवादी कारवाया थांबवत नाही. त्यांची भारताशी संबंध सुधारण्याची इच्छा नाही, असेही राम माधव म्हणाले.
पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचे प्रयत्न करत आहे. जगभरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असूनही, गेल्या काही आठवड्यांत जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाक सैन्याने गोळीबार केला. युद्धबंदीचे उल्लंघन केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.