नवी दिल्ली - विश्व मानसिक स्वास्थ्य दिवसानिमित्त एका स्वतंत्र संस्थेनं जारी केलेल्या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगामध्ये सर्वांत जास्त आत्महत्या ह्या भारतामध्ये केल्या जातात, असे अहवालामध्ये म्हटले आहे.
दिवसेंदिवस आत्महत्या तसंच मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. २१ व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञांनी सांगितलं. प्रत्येक वर्षी भारतामध्ये २.२ लाख आत्महत्या होत आहेत. हा एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आजारांविषयी जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.
कॉसमॉस इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड बिहेवियर सायन्सेस या संस्थेनं सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार भारतामध्ये मानसिक स्वास्थ ठीक नसलेल्यांची संख्या १३.७ टक्के एवढी असून जवळपास १५ लाख लोकांना समुपदेशनाची गरज आहे.
जवळपास ४३ टक्के लोकांना आपल्या मानसिक आजार असल्याची माहिती असते. मात्र फक्त २० टक्के लोक त्यावर उपचार घेतात. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. सी. आय. एम. बी. एस. नुसार प्रती १ लाख लोकांच्या मागे आत्महत्येची टक्केवारी तब्बल १७.८ आहे. तर हीच टक्केवारी जगामध्ये ही १०.५ एवढी आहे.