नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर टोळधाड आली होती. अशी टोळधाड पिकांचं मोठं नुकसान करते, त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. या टोळधाडीचा बिमोड करण्यासाठी कृषी मंत्रालयच्यावतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यासंदर्भात एक अनोखा प्रयोग करण्यात आला असून ड्रोनद्वारे या टोळधाडीवर नियंत्रण ठेवण्याची चाचपणी करण्यात आली.
सध्या भारतामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये डझनभराहून अधिक टोळधाडी सक्रीय आहेत. तज्ज्ञांच्या मते पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेती खराब करणारे टोळधाड एप्रिलमध्ये पाकिस्तानातून भारतात आली. टोळांवर नियंत्रण आणण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे. ड्रोनद्वारे होत असलेली फवारणी प्रभावी होत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आपत्ती निवारण कायद्यांतर्गत टोळधाड नियंत्रणासाठी कोषागारातील निधी वापरावा, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ह्या टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी़ केंद्र सरकारने गट तयार केले असून राज्य सरकारांमध्ये समन्वय ठेवून काम केलं जात आहे.