तरण तारण साहीब- जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापा टाकला असता सीमा सुरक्षा दलाला ३ किलो हेरॉईन आणि ३० ग्राम गांजा सापडला आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत ५ कोटी इतकी आहे. याप्रकरणी 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाने खालरा सीमा भागातून १ किलो १२९ ग्राम हेरॉईन जप्त केला आहे. हा माल एका बुटामध्ये लपवून ठेवण्यात आला होता. तसेच, सुरक्षा दलाने नौशेरा ढाला येथून २ किलो ४१६ ग्राम हेरॉईन जप्त केला आहे. या दोन्ही अमली पदार्थसाठ्याची किंमत ५ कोटी इतकी आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांना अटक केली आहे. बिक्रमजीत सिंह, निर्मल सिंह, नच्चातर सिंह, पंजाब सिंह आणि राजू, असे अटक केल्या संशयितांची नावे आहेत. या सर्व जणांवर खालरा पोलीस ठाणे आणि सराई अमानत खान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अलीकडे अमली पदार्थ तस्करीला पेव फुटल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात कस्टम विभागाला मिठाच्या मालात अमली पदार्थ आढळले होते. हा माल ५०० किलोचा होता आणि त्याची किंमत २ हजार ७०० कोटी इतकी होती. माल पाकिस्तानहून भारतात आला होता. तसेच, तरण तारण साहीब येथून ३० कि.मी अंतरावर असलेल्या अटारी सीमेवरील एकात्मिक पोस्टजवळ कस्टम विभागाला ५३२ किलो हेरॉईनचा साठा सापडला होता. हा आतापर्यंत केलेल्या कारवाईत सापडलेला सर्वात मोठा अमली पदार्थसाठा असल्याचे कस्टम विभागाचे आयुक्त दीपक कुमार गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा- आयएस दहशतवाद्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह आत्मघातकी हल्ल्यातील जॅकेट ताब्यात