अयोध्या - मागील अनेक दशकांमध्ये अयोध्या रामजन्मभूमीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले होते. राजकीय पक्ष मंदिर आणि मशिदीच्या मुद्द्यावरून आपापसांत आरोप-प्रत्यारोप करत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा प्रश्न सुटला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वादात सापडलेली जागा दिल्यानंतर मशीद बांधण्यासाठीही पाच एकर जागा द्यावी, असे न्यायालयाने सांगितले होते. ही जमीन IICF म्हणजेच इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनला देण्यात आली आहे. यानंतर IICF ट्रस्टने त्यांचा अधिकृत लोगो जारी केला आहे. ट्रस्टने मशीद बांधण्याची तयारी सुरू केली आहे. अयोध्येपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर धन्नीपूर गावात मिळालेल्या या जमिनीची ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी केली. 5 एकर जागेवर बांधण्यात येणाऱ्या या मशिदीसह या जागेवर कम्युनिटी किचन, रुग्णालय, संशोधन संस्था आदी सुविधाही तयार करण्यात येणार आहे.
मशिदीच्या बांधकामाआधी ट्रस्टने जारी केलेला लोगोमध्ये इंडो-इस्लामिक संस्कृतीचे प्रतीक आहे. या लोगोमध्ये हुमायूनच्या कबरीमध्ये वापरलेल्या स्थापत्यशास्त्राची नक्षीदार झलक पहायला मिळते. हा लोगो कसा तयार करण्यात आला, याविषयी आणि त्याच्या शैलीविषयी जाणून घेण्यासाठी फाउंडेशनचे प्रवक्ते अतहर हुसैन यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला. यातून समजलेल्या काही खास बाबी...
हा लोगो कोणत्या संस्कृतीचे दर्शन घडवतो, असे विचारले असता 'हा बहुभुजी आकार जगातील सर्व संस्कृतींची झलक दर्शवतो. एका बाजूला यामध्ये इंडो-इस्लामिक संस्कृतीची झलक पहायला मिळते. तर, दुसरीकडे ज्यू, ख्रिश्चन आणि यहुदी स्थापत्यकलेचाही यात सुंदरपणे वापर केला आहे', असे ते म्हणाले. ट्रस्टद्वारे बहुभुजी आकार किंवा अष्टकोनी रचना किंवा ऑक्टाग्राम लोगोच का निवडण्यात आला आणि इस्लामी संस्कृतीत त्याचे काय महत्त्व आहे, याविषयीही त्यांनी माहिती दिली.
इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनमध्ये 15 सदस्य असतील. मात्र, सध्या यातील 9 सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर अहमद फारूकी ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. तर, अदनान फारूक शाह यांची ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली. ट्रस्टचे प्रवक्ते आणि सचिव अतहर हुसैन असतील. फैज आफताब यांना मशीद निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष बनवले आहे. ट्रस्टचे संस्थापक सदस्य सय्यद मोहम्मद शोएब आहेत. इमरान अहमद, मोहम्मद जुनैद सिद्दीकी, मोहम्मद राशिद, शेख सैदुज्जम्मान हे ट्रस्टच्या सदस्यपदी आहेत.