नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज(शनिवार) भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यावर जोरदार टीका केली. प्रधानमंत्री मदत निधीतून 2005 साली राजीव गांधी निधीला (RGF) मिळालेली 20 लाख रक्कम जर माघारी केली तर चीन भारतीय भूभागातून माघारी जाईल, याची खात्री पंतप्रधान मोदी देतील का? असा सवाल चिदंबरम यांनी भाजपला केला आहे.
अर्धसत्य बोलण्यात जे. पी नड्डा तरबेज असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला. 2005 साली राजीव गांधी निधीला प्रधानमंत्री मदत निधीतून 20 लाखांची मदत मिळाली होती, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी शुक्रवारी केले होते. मात्र, ही रक्कम 2004 साली आलेल्या सुनामीनंतर राबविण्यात आलेल्या मदत कार्यासाठी वापरली, असे काँग्रेसने स्पष्ट केले.
भाजप अध्यक्ष नड्डा अर्धसत्य बोलण्यात तरबेज आहेत. माझे सहकारी रणदीप सुरजेवाला यांनी काल जे. पी नड्डा यांचे अर्धसत्य उघडे पाडले आहे. सुनामीनंतर मदत कार्यासाठी ही रक्कम वापरण्यात आली हे भाजप का लपवत आहे. या कामासाठी खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा आमच्याकडे हिशोब आहे, असे चिदंबरम म्हणाले.
15 वर्षांपूर्वी राजीव गांधी फंडाला मिळालेल्या रकमेचा आणि 2020 साली चीनने भारतात केलेल्या अतिक्रमणाचा काय संबध आहे, असा सवाल चिदंबरम यांनी केला. जर आरजीएफने 20 लाख रक्कम माघारी केली तर चीन भारतीय भूभागातून माघारी जाईल याची खात्री पंतप्रधान मोदी देतील का? असे चिदंबरम म्हणाले.