हैदराबाद - उन्नावमधील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने पीडितेचा मृत्यू झाला. यावर हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या वडिलांनी मत व्यक्त केले आहे. उन्नावमधील पीडितेचा मृत्यू झाला, तसेच तिचे कुटुंबीयही दु:खात आहेत. त्यांचे दोन्ही बाजूने नुकसान झाले असून पीडितेचा जीव गेला आणि कुटुंबाचा समाजातील मानही गेला. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या आरोपींना त्वरीत फाशी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या चकमकी विरोधात याचिका दाखल होत असल्यावरूनही त्यांनी मत व्यक्त केले. आरोपींनी हल्ला केल्यामुळेच पोलिसांनी चकमक केली. पोलीस आयुक्तांनीही जे सांगितले त्यावर आमचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार मारले. त्यावरून देशभरामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी पीडितेला त्वरीत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे, तर काहींनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. उन्नावमधील पीडितेलाही असाच न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. हैदराबाद घटनेत न्यायव्यवस्थेला डावलून आरोपींची हत्या करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय नेत्यांनी केला आहे.