नवी दिल्ली - मरकज प्रकरणासाठी सर्व मुस्लिम समाजाला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाने(एनसीएम) मांडले आहे. मागच्या महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातने मरकजचे आयोजन केले होते. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भावाला बळ मिळाले. ही नक्कीच वाईट गोष्ट आहे मात्र, यामुळे संपूर्ण समाजाला जबाबदार धरणे हे ही चुकीचे आहे.
राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे सहसचिव डॅनियल ई. रिर्चड यांनी प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोचे संचालक के. एस. धतवालिया यांना याबाबत एक पत्र लिहले आहे. माध्यमांत मरकज प्रकरणाचे वास्तविक स्वरुप दाखवणे गरजेचे झाले आहे. या प्रकरणामुळे देशातील मुस्लिम समाजाकडे अपराध्यासारखे पाहिले जात आहे.
माध्यमांमध्ये मरकजला देशातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य कारण सांगितले जात आहे. हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे मात्र, मुख्य कारण नाही. कोरोनाचा विषाणू व्यक्तिची जात, धर्म, पंथ पाहत नाही. याची लागण कोणालाही होऊ शकते, त्यामुळे फक्त मुस्लिम समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे डॅनियल ई. रिर्चड यांनी या पत्रात म्हटले आहे.
उत्तर प्रदेश अल्पसंख्यक आयोगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तबलीगी जमातच्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी शुक्रवारी केली. राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाने या गोष्टीला पाठिंबा दिलेला नाही.