नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चीन सीमेलगत असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून इंडो-तिबेटीयन सीमा पोलिसांची किन्नौरच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवली आहे. हिमाचलमध्ये सुमारे 260 कि.मी. सीमा चीनशी जोडलेली आहे. त्यातील 180 किमी किन्नौर तर, 80 किमी लाहौल व स्पीती जिल्ह्याशी जोडलेली आहे.
हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पिती आणि किन्नौर जिल्ह्यांमधील सीमेजवळ भारतीय आणि चिनी सैन्य तैनात आहेत. त्यामुळे सीमेजवळील गावात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून हिमाचल पोलिसांनी सीमेजवळील भागात तयारी वाढवली आहे. याचबरोबर चिनी सैन्यानेही सीमेवरील हालचालीत वाढ केली आहे.
हिमाचल प्रदेशातील चीन सीमेलगत असलेल्या गावांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे जादा सैन्य तैनात करून सुरक्षा कडक करण्यात आली आहे. परवानगीशिवाय कोणालाही या गावांमध्ये जाण्यास बंदी करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
देशाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर रशिया दौऱ्यावर असून त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. अखेर दोन तास चाललेल्या या बैठकीच्या शेवटी दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्र्यांचे पाच मुद्द्यांवर एकमत झाले. मात्र, चीनने नेहमीच करारांचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी चीनने सीमेवर शांतता प्रस्थापीत करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच, 15 जूनला तसेच 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री घुसखोरी केली होती. 15 जूनला झालेल्या चकमकीत 20 जवान हुतात्मे झाले होते. तर 29 आणि 30 ऑगस्टच्या भारतीय सैन्याने चीनच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला होता.