नवी दिल्ली - डेक्सामेथासोन या अल्पदरातील आणि मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड म्हणून वापर होणाऱ्या औषधाचा वापर आता कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना होणार आहे. कोरोना उपचार नियमावलीत(प्रोटोकॉल) या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य लक्षणे ते तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर डेक्सामेथासोन वापरण्यात येणार आहे.
अद्ययावत करण्यात आलेल्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये डेक्सामेथासोन औषधाचा समावेश करण्यात आला आहे. सूज विरोधी आणि प्रतिकारक्षमता कमी करणाऱ्या आजारांमध्ये मिथेलप्रिडीनीसोलोन या औषधाला पर्यायी म्हणून डेक्सामेथासोन आधीपासूनच वापरण्यात येत आहे. आता कोरोना रुग्णांवरही हे औषध वापरण्यात येणार आहे.
कोरोना आजाराबाबत नव्याने माहिती हाती येत आहे. विशेषत: कोणते औषध प्रभाविपणे काम करते. त्यानुसार डेक्सामेथासोन या औषधाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर हाती आलेले पुरावे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर या औषधाचा वापर करण्याचे ठरविण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालायच्या सचिव प्रिती सुदान यांनी अद्ययावत नियमावली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविली आहे. त्यानुसार राज्यांनी हे औषध उपलब्ध करुन रुग्णांवर उपचारासाठी वापरावे, असे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.