लखनऊ : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील अत्याचार पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली होती. मंगळवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सायंकाळी तिचा मृतदेह आपल्या गावी नेण्यात येणार होता. मात्र, तिचा मृतदेह गावी पोहोचण्यास उशीर झाला. मंगळवारी रात्री गावामध्ये तिचा मृतदेह आणण्यात आल्यानंतर, प्रशासनाने लगोलाग तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन टाकले. विशेष म्हणजे, तिचे कुटुंबीय आणि गावकरीही अशा प्रकारे रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते, मात्र गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
मंगळवारी रात्री तिचा मृतदेह तिच्या गावामध्ये आणण्यात आला. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे होते, की अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी सकाळी केला जावा, रात्री नको. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही, आणि रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार करुन टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिच्या कुटुंबियांनाही अंत्यविधीच्या ठिकाणी येऊ दिले नाही. तसेच, पोलिसांनी मीडियालाही त्याठिकाणी येण्यापासून मज्जाव केला होता.
याबाबत बोलताना अतिरिक्त दंडाधिकारी प्रेम प्रकाश मीणा यांनी कुटुंबियांच्या परवानगीनेच पीडितेवर अंत्यसंस्कार केले असल्याचे म्हटले आहे. मात्र, गावकरी आणि कुटुंबियांच्या मते त्यांना याठिकाणी येण्यासही मनाई करण्यात आली होती. पोलिसांनीच घाई-घाईत चिता रचत पीडितेचा अंत्यविधी केला. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पोलिसांनी घरात बंद केले होते. "आपल्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकलो नाही, यासोबतच तिच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकलो नाही याचे दुःख आहे. आपल्या देशात आजही मुली सुरक्षित नाहीत", असे त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी-जोशी-उमा भारतींना न्यायालयात हजर न राहण्याची सूट