गांधीनगर - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून काँग्रेसने काही आमदार राजकोटमधील नील सीटी रिसॉर्टमध्ये ठेवले आहेत. मात्र, या रिसॉर्ट विरोधात पोलिसांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याविरोधात काँग्रेस नेते हार्दिक पटेल कार्यकर्त्यासह आंदोलन करत आहेत. 'आमचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी भाजप नेते गुन्हे दाखल करत आहे, अशी टीका हार्दीक पटेल यांनी भाजपवर केली.
रिसॉर्टच्या आवारामध्ये हार्दिक पटेल आणि कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत. यावेळी पटेल यांनी चार दिवसांपुर्वीची एक घटना सांगितली. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत अहमदाबादच्या महापौरांनी आंबा महोत्सवात भाग घेतला. मात्र, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. सत्ताधारी आम्हाला लक्ष करत आहेत. कारण, त्यांना माहित आहे आम्ही गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांच्या अडचणी समोर आणत आहोत, असे पटेल म्हणाले.
पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. अमित शाह आणि मोदींना गुजरात सोडायचा नाही. त्यासाठी त्यांचे नाटक सुरु आहे. गुजरातची सत्ता सोडली तर आपली जुनी प्रकरणे बाहेर निघतील याची त्यांना भीती वाटत आहे असे पटेल म्हणाले.
बिहारमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण होते तेव्हा सरकारने राज्यसभेची निवडणुक रद्द केली होती. आता त्यापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. तरी निवडणुका जाहीर केल्या. महामारीच्या काळात निवडणुकांवर खर्च करण्याची सरकारला काय गरज आहे, तोच पैसा कोरोनाचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यावंर खर्च करता येईल, असा प्रश्न पटेल यांनी उपस्थित केला.