मुंबई - सुषमा स्वराज माझ्या आईसारख्या होत्या. त्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. माझ्या हृदयात त्यांच्यासाठी कायम जागा असेल, असे भावूक उद्गार हमीद अन्सारी या तरुणाने काढले. मुंबईत राहणारा हमीद अन्सारी नावाचा तरुण पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिला भेटण्यास पाकिस्तानमध्ये गेला होता. मात्र, तेथे त्याला गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले होते.
हमीद पाकिस्तानातील एका मुलीच्या 'आंधळ्या' प्रेमात पडला होता. या प्रेमापोटी नोव्हेंबर २०१२ मध्ये त्याने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. खोटे ओळखपत्र तयार करुन अफगानिस्तान मार्गे हमीदने पाकिस्तानात प्रवेश केला. तेथे त्याला एका हॉटेलातून पाकिस्तान सरकारने गुप्तहेर असल्याच्या संशयावरुन अटक केली. हमीद अन्सारी पाकिस्तानात अडकल्याचे समजतात त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. परराष्ट्र मंत्रायलाने हा मुद्दा पाकिस्तान सरकारकडे उचलून धरला. सुषमा स्वराज यांनी हमीदच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.
पाकिस्तान सरकारने हमीदचा खटला लष्करी न्यायालयात चालवला. पाकिस्तानात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्ररणी दोषी धरत हमीदला पेशावर येथील तुरुंगामध्ये डांबण्यात आले. सुषमा स्वराज यांनी हमीदच्या सुटकेसाठी सतत पाठपुरावा केला. त्यानंतर डिसेंबर २०१८ साली पाकिस्तान सरकारने त्याची सुटका केली. त्याने तीन वर्ष पेशावरच्या तुरुंगात शिक्षा भोगली.
हमीद अन्सारीची सुटका झाली तेव्हा सुषमा स्वराज यांची अन्सारी कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यावेळी हमीदच्या आईने स्वराज यांचे आभार मानले होते. स्वराज यांनी हमीदला आणि अन्सारी कुटुंबीयांना दिलासा दिला होता. स्वराज यांच्या निधनांतर हमीद भावूक झाला असून, त्या माझ्या आईसारख्या होत्या असे उद्गार त्याने काढले आहे.