नवी दिल्ली - देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. भारतातील रस्ते विकासासंदर्भात वेबिनारला संबोधित करताना ते म्हणाले.
आम्ही थेट परदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न करत आहोत. कारण, पायाभूत सुविधांमध्ये 100 टक्के विदेशी गुंतवणूकीला मान्यता देण्यात आली आहे. विविध पेन्शन फंड, विमा फंड आणि वित्तीय संस्थांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
विमा निधी, पेन्शन फंड मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच जागतिक बँक, एडीबी, ब्रिक्स बँक यांच्यासोबत व्यवहार करत असून या दिशेने वेगाने पुढे जात आहोत, असे ते म्हणाले.
थेट परकीय गुंतवणूक म्हणजे दोन विविध देशांतर्गत कंपन्यांना एकमेकांच्या देशात गुंतवणूक करण्याची मुभा. अशा प्रकारच्या गुंतवणूकीमुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांच्या देशात काही ठराविक टक्के रक्कम गुंतवण्याची संधी मिळते. देशात परकीय भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चांगला फायदा होतो.