भूवनेश्वर - कोरोना काळात भारताची अर्थव्यवस्था रसातळाला पोहचली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकास दर उणे २३.९ टक्के झाला आहे. मात्र, भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी सरकारची पाठराखण केली आहे. कोरोना काळात सरकारने टाळेबंदी करून भारतीय जनतेचे फक्त जीव वाचविले नाही, तर अर्थव्यवस्थेचीही काळजी घेतली. सरकारने उचललेल्या पावलांमुळे एका संकटाचे संधीत रुपांतर झाले, असे नड्डा म्हणाले.
ओडिशातील पक्षाच्या कार्यकारणीत त्यांनी हे वक्तव्य केले. 'शक्तीशाली देश जेव्हा कोरोनाचा सामना करताना असहाय्य झाले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार स्पष्ट होते. लोकांचे जीव वाचविण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले. १३० कोटी जनतेचे जीव वाचविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले होते. 'जान है तो जहाँ है' असे मोदींनी म्हटले होते. तेव्हा सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवणे हा मुद्दा मोदींपुढे होता', असे नड्डा म्हणाले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी योग्य वेळी देशात टाळेबंदी करण्यात आली. तसेच देशभरात योग्य अंमलबजावणी करण्यात आली. आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांसोबतच सरकारने आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत योजना सुरू केल्या. भारताने केलेल्या उपाययोजनांची संयुक्त राष्ट्राच्या सक्रेटरी जनरल यांनी दखल घेतली होती. कोरोना संकट आणि आव्हानांचे भारताने संधीत रुपांतर केल्याचे नड्डा म्हणाले.
भारताचा जीडीपी निगेटिव्हमध्ये गेला असताना विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राष्ट्रीय युवक काँग्रेसने रोजगार दो अभियान सुरू केले आहे. बांधकाम, पर्यटन, निर्मिती, व्यापार, सेवा, कृषी सर्वच क्षेत्रांमधील विकास दर खुंटला आहे. राहुल गांधी, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, सोनिया गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.