अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा काश्मीरमध्ये पुरवठा - j k jammu and kashmir
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून प्रशासनाने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा काश्मीर खोऱ्यात केला आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीर राज्याची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर राज्याचा बहुतांश भाग मागील १२ दिवसांपासून बंद आहे. चौकाचौकामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून प्रशासनाने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा काश्मीर खोऱ्यात केला आहे.
पेट्रोल डिझेलचे टँकर, धान्य, भाजीपाला यांच्यासह पोल्ट्री आणि शेळ्या मेंढ्यांचाही पुरवठा केला आहे. याआधीही खोऱ्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला होता, त्यात वाढ करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
संपूर्ण काश्मीर खोऱ्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार के. के शर्मा यांनी सांगितले.
काल (शुक्रवारी) जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी. आर सुब्रह्मण्यम यांनी टप्याटप्याने काश्मीर खोऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालये आणि मोबाईल सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले. सरकारी कार्यालये आणि सचिवालयाचे कामकाज शुक्रवारपासून सुरू झाल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे, लवकरच काश्मीरमधील जनजीवन सुरळीत होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.