नवी दिल्ली - पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री आणि लेखीका अमृता प्रीतम यांच्या 100 व्या जंयती निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये अमृता यांनी डोक्यावर ओढणी घेतलेली असून त्या काही लिहित आहेत. अमृता प्रीतम या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.
हे ही वाचा - ट्विटरचे सहसंस्थापक व सीईओ डोरसी यांचे ट्विटर अकाउंट हॅक
अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९ मध्ये भारतातल्या पंजाब राज्यातील गुजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
हे ही वाचा - वादाच्या भोवऱ्यात 'साहो' : निर्मात्यावर लिसा रेने केला 'चोरी'चा आरोप
अमृता प्रीतम यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, तर १९६९ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान केला होता. याचबरोबर १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
३१ ऑक्टोम्बर 2005 ला वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या कविता आणि लेखनाच्या माध्यमातून त्या आजही जिंवत आहेत.