पणजी - गोवा विधासभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी लोबो यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तर लोबो आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
राजीनामा दिल्यानंतर लोबो म्हणाले, पदाचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला आहे आणि, मी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी मी सोमवारपासून पार पाडणार, असेही लोबो यांनी सांगितले. काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची संख्या 27 झाली आहे. त्यामुळे नव्याने आघाडीतील घटक पक्षांकडे असलेल्या मंत्र्यांकडील पदे काढून घेतली जाणार आहेत आणि त्यामध्ये फेरबदल केले जाणार आहेत.
आघाडीतील घटकपक्षांना बाजूला करण्याचे कारण काय ? असे विचारले असता लोबो म्हणाले, मी कोणाचेही नाव घेणार नाही. मात्र, ते ज्याप्रकारे लोकांशी वागत होते ते अत्यंत चुकीचे होते. वैयक्तिक स्वार्थ साधण्यातच त्यांनी मागची अडीच वर्षे घालावली. गोव्यातील जनता त्यांच्या कारभारावर नाराज आहे, असेही त्यांनी सांगितले. तर 2017 मध्ये सरकार घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडूनही आपल्याला मंत्रिपद मिळण्यास एवढा उशीर का झाला ? या प्रश्नाचे उत्तर देताना लोबो म्हणाले, काही लोकांनी मायकल मोठा होईल, या भीतीने मला मंत्री बनविण्यास विरोध केला. दरम्यान, सभापती पाटणेकर यांनी राजीनामा स्वीकारला आहे. राजीनाम्याचे नेमके कारण दिले नसल्याचे ते म्हणाले.