पुणे - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गरिबांसाठीच्या किमान उत्पन्न योजनेसाठी (NYAY - न्यूनतम आय योजना) मध्यम वर्गीयांचा खिसा कापणार नाही असे म्हटले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास गरिबांना किमान उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाणार आहे. मात्र, यासाठी मध्यमवर्गावर कराचा बोजा वाढवला जाणार नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.
काँग्रेस देशातील गरिबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार आहे. यासाठी असलेल्या कराच्या उत्पन्नातूनच योजना राबवण्याचा मार्ग काढला जाणार आहे. याशिवाय राहुल गांधींनी महिलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले आहे.
देशातील नोकऱ्यांविषयी राहुल यांनी चीनशी तुलना केली आहे. चीनमध्ये प्रत्येक २४ तासांमध्ये ५० हजार नोकऱ्या तयार होतात. तर, भारतात तेवढ्याच काळात २७ हजार नोकऱ्या नष्ट होत आहेत. देशातील गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये दिल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडून त्यांची वस्तू खरेदी करण्याची क्षमता वाढेल, असे राहुल म्हणाले.