नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
शंकरसिंह वाघेला यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे. शंकरसिंह यांना गांधीनगर येथील निवासस्थानी विलिगीकरणात ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी सकाळी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. यासंबधित सर्व माहिती शंकरसिंह यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान गुजरात राज्यात 30 हजार 709 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 789 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 6 हजार 511 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 22 हजार 409 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशभरामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 28 हजार 859 इतका झाला आहे. तर एकूण 16 हजार 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.