नवी दिल्ली - पंजाबमधील मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर नाराज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधीची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राहुल यांना एक चिठ्ठी दिली आहे. यावेळी सिद्धूंनी मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलावर नाराजी व्यक्त केली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या सिद्धूंनी महासचिव प्रियंका गांधी यांच्याशीही चर्चा केली. यावेळी वरीष्ठ नेते अहमद पटेलही उपस्थित होते. राहुल यांना सोपवलेल्या चिठ्ठीत सिद्धूंनी काय लिहिले आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. सुत्रांनुसार सिद्धूंनी राहुल यांना पंजाबमधील परिस्थितीची जाणीव करुन दिली असून त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात फेरबदल करताना नवज्योत सिंग सिद्धूंकडून स्थानिक विकासाचे महत्वपूर्ण खाते काढून घेतले आहे. त्यांना आता उर्जा आणि पारंपरिक उर्जा खात्याचा भार सोपवण्यात आला आहे. परंतु, सिद्धूंनी अद्याप या पदाचा पदभार स्वीकारला नाही.
नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात तणाव वाढला असून दोघेजण सार्वजनिकरित्या एकमेकांवर टीका करत आहेत. काँग्रेसला शहरी भागात मतदान न मिळण्याचे कारण सिद्धू आहेत, असा आरोप अमरिंदर करत आहेत. तर, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे कॅप्टन फक्त राहुल गांधीच आहेत, अशी विधाने सिद्धू यांनी केली आहेत.