चेन्नई(तामिळनाडू) - राज्याच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांची नावे चेन्नईतील मेट्रो स्टेशनला देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. माजी मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई, एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे.
राज्य शासनाने उच्चस्तरीय समितीच्या प्रस्तावानंतर माजी मुख्यमंत्र्यांची नावे मेट्रो स्टेशनला देण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अलांदूर मेट्रो स्टेशन आता अरिगनार अण्णा अलांदूर मेट्रो स्टेशन, सेंट्रल मेट्रो स्टेशन आता थलाईवार डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल मेट्रो स्टेशन आणि सीएमबीटी सबर्बन मेट्रो स्टेशन थलाईवी हे जयललिता सीएमबीटी मेट्रो स्टेशन नावाने ओळखले जाईल.
अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकाळात जयललिता या मुख्यमंत्री असताना चेन्नईमध्ये मेट्रो रेल प्रकल्प राबवण्यासाठी करण्यात आलेल्या कामांची यादी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जाहीर केली. चेन्नई मेट्रो रेल प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा 61 हजार 843 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पात तीन कॉरिडॉर असतील, असे त्यांनी सांगितले. माधवरम ते सिपकोट, लाईट हाऊस ते पूनामाल्ली आणि माधवरम ते शोलिनगनालूर या तीन टप्प्यांचा समावेश असेल. तीन टप्प्यांचे अंतर 118.9 किमी आहे. राज्य शासनाने प्रस्ताव मंजूर केला आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीची आणि निधीची वाट पाहत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सीएन अण्णादुराई हे 1967 ते 1969 या कालावधीमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. एमजी रामचंद्रन हे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक होते. त्यांनी 1977 ते 87 या मुख्यमंत्री पदावर काम केले. जयललिता यांनी 1989 ते 2016 या दरम्यान एकूण 14 वर्षे मुख्यमंत्रिपदावर काम केले होते.
दरम्यान, राज्य शासनाला मेट्रो स्टेशनची नावे बदलणे आणि 1 हजार ठिकाणांच्या नावांच्या अक्षरांमध्ये बदल करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. तामिळ इतिहासकार आणि भाषातज्ज्ञांनी जोरदार टीका केली होती.