पणजी (गोवा) - सर्व उमेदवारांना सरकारी नोकरी देणे देवाच्या हातीही नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी म्हणाले. वेब कॉन्फरन्सद्वारे आपल्या सरकारच्या महत्वाकांक्षी 'स्वयंपूर्ण मित्र' या उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर सावंत पंचायत प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, उद्या देव जरी मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना सरकारी नोकरी देणे शक्य होणार नाही.
स्वयंपूर्ण मित्र उपक्रम
'स्वयंपूर्ण मित्र' उपक्रमांतर्गत राजपत्रित अधिकारी पंचायतींना भेट देऊन तळागाळातील गावांपर्यंत राज्य सरकारच्या विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करतील. प्रत्येक गावातील स्त्रोतांची सखोल तपासणी करतील आणि ग्रामस्थांना स्वावलंबी होण्यासाठी त्या आधारित सूचना करतील, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. लोकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता इतर उद्योगांकडेही वळणे गरजेचे आहे.
सावंत म्हणाले, बेरोजगारांना दरमहा किमान 8,000 ते 10,000 रुपयांपर्यंतचा रोजगार मिळायलाच हवा. गोव्यामध्ये बऱ्याच नोकऱ्या आहेत, ज्या बाहेरचे लोक मिळवत आहेत. आमच्या 'स्वयंपूर्ण मित्र' उपक्रमांतर्गत गावातील बेरोजगारांना छोट्या-मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील.