नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गर्दीच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या भीषण बॉम्बस्फोट मालिकेच्या आठवणीने आजही दिल्लीकरांच्याअंगावर शहारे येतात.
13 सप्टेंबर 2008 ला सांयकाळी दिल्लीतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी चार बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला. तर 90 जण गंभीर जखमी झाले. यामध्ये पहिला स्फोट हा गफ्फार मार्केटमध्ये झाला. त्यानंतर दुसरा कनॉट प्लेस, तिसरा आणि चौथा ग्रेटर कैलाशच्या एम ब्लॉक मार्केटमध्ये झाला. 31 मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेने दिल्लीवर शोककळा पसरली.
बॉम्बस्फोटासंबधित इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने एका मोठ्या वृत्त वाहिनीला ई-मेल पाठवला होता. 'हल्ला थांबवू शकत असाल, तर थांबवा', असे त्या मेलमध्ये म्हटले. दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून चार बॉम्ब निकामी केले होते. या हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.