गुरुग्राम - शहरातील सायबर सिटी भागात राहणाऱ्या एकाने घरातील सर्वांचा खून केल्यानंतर स्वत: फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी प्रकाश सिंह यांच्या घरातील कोणीही दिसत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी प्रकाश यांच्या घरात प्रवेश करताच त्यांना मृतदेह दिसले. सेक्टर-४९ मधील उप्पल साऊथ ऐंड, एस ब्लॉक, फ्लॅट नंबर-२९९ मध्ये राहणाऱ्या डॉ. प्रकाश सिंह (५५) यांनी पत्नी कोमल, मुलगी आदितीया (१८) आणि आदित्य (१५) यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. यानंतर, स्वत: प्रकाश सिंह यांनी फाशी घेताना आत्महत्या केली. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले होते.
प्रकाश यांच्या खिशातून चिठ्ठी मिळाली आहे. घर चालवण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे, असे प्रकाश यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. परंतु, प्रकाश सिंह यांची पत्नी फाजिलपूर भागात खासगी शाळा चालवत होती. चिठ्ठी प्रकाश सिंह यांनीच लिहिली आहे का दुसऱ्या कोणी लिहिली आहे, हे हस्ताक्षर तज्ञाकडून तपासून घेण्यात येणार आहे. घटनास्थळावर काही हत्यारे सापडली आहेत. त्याआधारे तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रकाश सिंह सनफार्मा या कंपनीमध्ये काम करत होते. परंतु, काही काळापासून ते कामाला जात नव्हते. त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते किंवा त्यांनी राजीनामा दिला हे अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त कमल गोयल यांनी दिली.