नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य सिंधियावर निशाणा साधला आहे. 'ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर ग्वाल्हेरमधील काँग्रेसला नवचेतना आली आहे. सिंधिया निघून गेल्यानंतर ग्वाल्हेर झोनमधील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नवी उर्जा आली आहे. आम्ही सिंधिया यांचे आव्हान स्वीकारले आहे. आता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जनतेने ठरवलं तर कोणीही काँग्रेसला हरवू शकत नाही', असे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले.
15 महिन्यांच्या काँग्रेस सरकारमध्ये दोन मुख्यमंत्री असल्याच्या आरोपांवर दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या भाजपमध्ये चार मुख्यमंत्री आहेत. तर पाचवे नरोत्तम मिश्रा आहेत, अशी टीका सिंह यांनी केली.
कमलनाथ सरकारने माफिया, व्यभिचारी आणि अन्य घोटाळेबाजांवर कठोर कारवाई केली, अशा लोकांना घाबरून त्यांनी तत्कालीन सरकार पाडले, असेही सिंह म्हणाले.
राज्यात भाजपची सदस्यता मोहीम आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर काँग्रेससोबत भेदभाव केला जात आहे. श्री गणेश पंडाल व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसताना सदस्यता मोहिमेस परवानगी का दिली, असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील 27 जागांच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवड प्रक्रिया चालू आहे. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. प्रथम निवडणूक आयोगानेही निर्णय घ्यावा की, पोटनिवडणूक केव्हा होईल, तेव्हा कॉंग्रेसच्या उमेदवारांचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशात 27 जागांवरील पोटनिवडणुकीमुळेही राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि भाजप नेतेही एकमेकांवर जोरदार हल्ला करत आहेत. काही दिवसांपूर्वी ग्वाल्हेर प्रदेशातील अनेक काँग्रेस नेते सिंधिया यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. आगामी पोट निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते, असे बोलले जात आहे.