नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत निर्माण झालेला तणाव अजूनही निवळलेला नाही. सीलमपूर येथे काल (बुधवारी) दुपारी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. तर ईशान्य दिल्लीमध्ये संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
- नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अजूनही शमलेले नाही. आंदोलक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपीता महात्मा गांधीचे फोटो हातात घेऊन आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी तोंडाला पट्ट्या बांधलेल्या आहेत. सरकार आम्हाला बोलू देत नाही, आमचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
- बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा कसा लागू करता हे मी पाहतेच' - ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा
- आंदोलनाबाबत सोशल मीडियावरून खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, फेसबुक आणि ट्विटरकडेही तक्रार करणार - दिल्ली पोलीस
- सहा जणांना अटक, ३ खटले दाखल
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील सीमलपूर येथे आंदोलन झाले. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली, तर ३ खटले दाखल केले आहेत. सीमलपूर, जाफराबाद आणि ब्रिजपूरी येथे झालेल्या हिंसेप्रकरणी तीन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितले. - ईशान्य दिल्लीमध्ये संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
ईशान्य दिल्लीमध्ये काल दुपारी १२ च्या दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन निघाले होते. मात्र, त्यावेळी काही तरुणांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. हिंसक जमावाने बसवर दगडफेक केली. त्यामुळे दिल्लीमधील तणाव आणखीनच वाढला होता.
दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा विरोधही कायमच आहे. पोलिसांनी रविवारी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थींनी जामीया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांनी दिल्ली पोलीस मुख्यालयावर मोर्चा नेला होता. विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून दिल्ली पोलिसांवर टीकाही होत आहे.