नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. प्रदूषणाचीही गंभीर समस्या आहे. त्यामुळे येथील जवळपास 79 टक्के रहिवाशी दिवाळीनिमित्त फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. गुरुवारी जाहीर झालेल्या एका सर्व्हे अहवालातून हे उघड झाले आहे.
प्रत्येक वर्षी हिवाळ्याच्या दरम्यान धुके, हवेबरोबर धूळ, माती आणि प्रदूषणाचे कण एकत्र येवून भीषण हवा प्रदूषण होते. याचा आरोग्यासाठी मोठा धोका आहे. वैद्यकीय तज्ज्ञांना याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण, प्रदूषणामुळे कोरोना विषाणू आणखी काही काळ हवेमध्ये राहण्याची शक्यता असते, त्यामुळे शहरात संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढू शकते.
47 टक्के रहिवाशांना हवीय सर्व प्रकारच्या फटाक्यांवर, विक्रीवर बंदी
हवा प्रदूषणाविषयी लोकांचे मत समजून घेण्यासाठी 'लोकल सर्कल्स'ने सर्वेक्षण केले. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादमधील लोकांचा सणासुदीच्या काळात फटाके फोडण्याकडे कल आहे, की त्यांना प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडले नाही पाहिजे असे वाटते, हे समजून घेतले.
दिल्ली-एनसीआरमधील जवळपास 79 टक्के रहिवाशांना या दिवाळीत नियमित फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालायला हवी असे वाटते. तर 32 टक्के लोकांनी लहान, सामान्य फटाक्यांच्या विक्रीला पाठिंबा दर्शविला आहे. 47 टक्के रहिवाशांना सर्व प्रकारचे फटाके आणि फटाके विक्रीवर बंदी हवी आहे. तर 20 टक्के लोकांना सर्व फटाके विक्रीस परवानगी मिळावी, अशी इच्छा आहे. या सर्वेक्षणात एक टक्के लोकांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले नाही.