नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे गेले कित्येक महिने उद्योग आणि वाहतूक बंद होती. त्यामुळे राजधानी दिल्लीमधील हवेची गुणवत्ताही धोकादायक पातळीवर न राहता, मध्यम पातळीवर होती. मात्र, पंजाब-हरियाणा राज्यांमध्ये आता पुन्हा पेंढा जाळण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळण्याची शक्यता हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीने (सफर) वर्तवली आहे.
रविवारी पंजाब, हरियाणा आणि इतर शेजारी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेंढा जाळल्याचे दिसून आले. सध्याची हवेची दिशा पाहता, याचा थेट परिणाम दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेवर होऊ शकतो, असे सफरने सांगितले. येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळू शकते असा इशाराही सफरने दिला आहे.
केंद्रीय प्रदूषण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेचा गुणवत्ता स्तर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास १७६ होता. तर, सरासरी पीएम २.५ स्तर हा १०५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर एवढा होता.
पंजाब, हरियाणात हिवाळ्यात रब्बीचे गहू पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गव्हाची मळणी झाल्यानंतर जो टाकाऊ भाग म्हणजे, काड आणि भूसा उरतो, तो शेतकरी शेतातच पेटवून देतात. सर्रास शेतकरी मळणी झाल्यानंतर टाकाऊ भाग पेटऊन देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ही दोन्ही राज्ये दिल्लीच्या शेजारीच असल्याने परिसरात सगळीकडे धूर पसरतो. हिवाळ्यात तर त्याचा परिणाम आणखी होतो. दिल्लीतील दृष्यमानता कमालीची खालावते. सर्व शहरावर धुक्याची चादर पसरते. हा प्रकार दरवर्षी घडतो.