लखनऊ - गाजियाबादमध्ये विक्रम जोशी नावाच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला. भाचीला काही लोक त्रास देत असल्याची पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून जोशी यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात जोशी यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी विक्रम जोशी यांच्या भाचीला काही लोक त्रास देत होते. त्यामुळे त्यांनी विजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा राग मनात धरून आरोपींनी काल रात्री पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा त्यांच्या सोबत त्यांची लहान मुलगीदेखील होती, अशी माहिती विक्रम यांचा भाऊ अनिकेतने दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 9 जणांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. एका ठाणा प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधि नैथानी यांनी दिली.