हैदराबाद - देशातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा सामुदायिक संसर्ग होत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पहिल्यांदाच मान्य केले आहे. कोरोनाचा सामुदायिक संसर्ग देशभरात होत नसल्याचेही त्यांनी म्हटले. ते समाज माध्यमातील 'रविवार संवाद' या कार्यक्रमात बोलत होते.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ७४ लाख ९४ हजार ५५१ झाली आहे. तर एकूण १ लाख १४ हजार ३१ जणांचा आजतागायत कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
दिल्ली
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी मेट्रोमधील ९८ प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत नसल्याने दंड आकारला आहे. या प्रवाशांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नव्हते.
महाराष्ट्र-
मुंबई - दसऱ्यापासून राज्यात जिम्नॅशियम आणि फिटनेस केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. असे असले तरी झुम्बा, योग या व्यायामप्रकाराला परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थान-
जयपूर- गुज्जर नेते किरोरी सिंह बैनसला आणि इतर ३२ जणांविरोधात बयान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळता भारतपूरमध्ये रविवारी महापंचायतचे आयोजन केले होते.
ओडिशा-
भुवनेश्वर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन होत नसल्याने भुवनेशवर महापालिकेने (बीएमसी) रविवारी कोचिंग सेंटर बंद केले आहेत.