हैदराबाद : रशियाने स्पुटनिक-५ या आपल्या कोरोना लसीची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा सर्वसमावेशक अहवाल रशियाने भारताच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. मॉस्कोमधील 'गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी' या संस्थेने हा अहवाल भारतीय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ७६ लोकांवर घेण्यात आली होती. या सर्व लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकार शक्तीची वाढ झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता भारतातील तज्ज्ञ या माहितीचे मूल्यांकन करतील. यानंतर स्वतंत्र्यपणे तिसरी चाचणी घेण्यात येईल. तसेच, या सर्व प्रक्रियेनंतर याच महिन्यात या लसीचे उत्पादन सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर पाहूयात देशातील कोरोना संबंधी ठळक घडामोडी...
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मंत्रीमंडळाची आढावा बैठक घेतली. यासोबतच या बेैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. रुग्णांना टेलिमेडिसिन किंवा व्हॉट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ले देण्यात यावेत; तसेच कमी किंवा अगदीच लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार करण्यात यावेत, असे निर्देश बघेल यांनी यावेळी दिले.
रांची : सोमवारी आढळलेल्या १,२४६ नव्या रुग्णांनंतर झारखंडने ५० हजार रुग्णांचा टप्पा पार केला. आतापर्यंत राज्यात ४६९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७१.८६ टक्के आहे, असे आरोग्य विभागाने जाहीर केले.
भुवनेश्वर : गेल्या २४ तासांमध्ये आढळलेल्या ३,८६१ रुग्णांनंतर ओडिशामधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २७ हजार ८३२ झाली आहे. तसेच, सोमवारी झालेल्या १० मृत्यूंच्या नोंदीनंतर राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ५५६ झाली आहे. राज्यात सध्या ३० हजार ९१९ अॅक्टिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत ९६ हजार ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जयपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राजस्थानमधील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाने अभिनव उपक्रम राबवला आहे. या विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीबाहेर एक रोबोट उभारण्यात येणार आहे, जो येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे थर्मल स्कॅनिंग करेल. हा रोबोट दिल्लीहून मागवण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या उपकुलगुरूंनी सांगितले.