गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे क्वारन्टाईन केंद्र आणि आयसोलेशन केंद्रांमध्ये तबलिगी जमात येथील कोरोना विषाणू बाधित आणि कोरोना संशयित रुग्ण ठेवण्यात आले आहेत. या रुग्णांवर 24 तास आता पोलिसांचा पहारा बसवण्यात आला आहे. हे रुग्ण डॉक्टर आणि परिचारिकांशी असभ्य वर्तन करत असल्याचे समोर आले आहे.
तबलिगी जमात येथून आणलेल्या रुग्णांचे वर्तन बीभत्स, अश्लील असून ते रुग्णालयात अत्यंत बेशिस्तपणे वागत आहेत. ते त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांना अडथळा निर्माण होईल, असेही वागत आहेत. तसेच, त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी कोणतीही काळजी घेत नाहीत. यामुळे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून अक्षरशः रुग्णालयातील रुग्णांवर पोलिसांचा पहारा ठेवण्याची वेळ आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी, त्यांनी तबलिगी जमातमधून आणलेल्या रुग्णांचे वर्तन अश्लाघ्य आणि निंद्य असल्याचे सांगितले. याविषयी राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे, असे ते म्हणाले. यातील काही रुग्ण निजामुद्दीन तबलिगी जमातच्या मुख्यालयाशी संबंधित आहेत.
गाझियाबाद येथील एमएमजी शासकीय रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णांविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, येथील कर्मचाऱ्यांनीही यासोबत पत्र पाठवले आहे. यामध्ये 'तबलिगी जमातचे सदस्य रुग्णालयात अश्लील आणि बीभत्स वर्तन करत आहेत. ते अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचेही आम्हाला सांगण्यात आले आहे. तसेच, ते रुग्णालयात परिचारिकांसमोर अश्लील गाणी म्हणत त्यांची छेड काढत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित किंवा संशयित कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ते रुग्णालयात वारंवार सूचना दिल्यानंतरही इकडे-तिकडे थुंकून संसर्गाचा अधिक फैलाव करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर्स तसेच परिचारिका यांनी दिलेल्या सूचना ते सरळ-सरळ धुडकावून लावत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे,' असे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचेही आमच्या निदर्शनास आले आहे. यामुळे आम्ही तेथे 24 तास पोलिसांचा पहारा तैनात केला आहे, असे ते पुढे म्हणाले.
रुग्णालयाकडून आलेल्या तक्रारीची 2 एप्रिलला वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली होती. त्यांच्यासह गाजियाबादचे शहर पोलीस अधीक्षक मनीष मिश्रा आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र सिंह हेही होते. त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर तबलिगी जमात सदस्यांचे वर्तन अत्यंत अयोग्य आणि असभ्य असल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून तेथे पोलिसांना तैनात केले आहे. यामध्ये एक निरीक्षक दर्जाचा आणि एक उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असमार आहे. तसेच, दोन कॉन्स्टेबल्स आणि चार महिला पोलीस असणार आहेत. त्यांच्या 12-12 तासांच्या 2 पाळ्या असणार आहेत. हे सर्वजण दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस उपस्थित राहून पहारा देतील. काही अयोग्य घटना घडू नये, यासाठी सतर्क राहतील, असे कलानिधी यांनी सांगितले.