सुरत (गुजरात) – महिला बँक कर्मचाऱ्याला मारहाणप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक कर्मचारी संघटनेला दिले. महिलेला मारहाणप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी सुरतच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी संघटनेला दिली.
दोन दिवसांपूर्वी सुरतमधील कॅनरा बँकेच्या सरोली शाखेच्या परिसरात महिला कर्मचाऱ्याला पोलिसाने मारहाण केली होती. या घटनेनंतर ऑल इंडिया बँक कर्मचारी संघटनने (एआयबीईए) केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून अशा प्रकारामधून बँक कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी विनंती केली होती.
याबाबत निर्मला सीतारामन यांनी ट्विट केले आहे. सर्व बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या कोरोनासारखे आव्हान असताना बँकांकडून लोकांना सर्व सेवा देण्यात येत आहेत. त्यांच्या सुरक्षेला आणि स्वाभिमानाला धक्का बसू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुरत जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल यांच्याशीही चर्चा केली आहे. याबाबतही त्यांनी ट्विट केले आहे. जिल्हाधिकारी सध्या सुट्टीवर आहेत. मात्र, योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिल्याचे अर्थमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कार्यालयाच्यावतीने पोलीस आयुक्त ब्रह्मभट्ट यांच्याशी बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली आहे. आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
महिला बँक कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.