नवी दिल्ली - ईव्हीएममध्ये छेडछाडीचा मुद्दा तापलेला असतानाच काँग्रेसने याविरोधात पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला आहे. ईव्हीएमध्ये भाजपच्या चिन्हासोबत इंग्रजीत 'बीजेपी' लिहिलेले आढळले आहे. असे कोणत्याही पक्षाच्या चिन्हासोबत लिहिलेले नाही, असा आक्षेप काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतला आहे. त्यामुळे ईव्हीएमचा वाद थंडावण्याच्या जागी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकींच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वी ईव्हीएमवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ईव्हीएममध्ये पक्षांच्या निवडणूक चिन्हासोबत पक्षाचे नाव नसते. मात्र, भाजपच्या चिन्हासमोर बीजेपी लिहिले असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याविरोधात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गोंधळाबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती केली आहे.
निवडणूक आयोगाने एकतर भाजपच्या चिन्हासमोर पक्षाचे नाव देऊ नये किंवा सर्व पक्षांच्या चिन्हासमोर नाव लिहावे, असे मनू सिंघवी यांचे म्हणणे आहे. यापूर्वी ईव्हीएमच्या पारदर्शकेतवर अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. तर, मतमोजणीच्यावेळी ५० टक्के व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्यांचीही मोजणी करावी, असे विरोधी पक्ष मागणी करत आहेत.
यापूर्वी अमेरिकेमध्ये एका भारतीय अभियंत्याने आपण ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा केला होता. त्याच्या या दाव्यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. काँग्रेसच्या आरोपावर आयोग काय पाऊल उचलणार आता यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.