हरिद्वार (उत्तराखंड) - कुंभमेळासाठी केंद्र सरकारकडून नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यात कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला नोंदणी आणि वैद्यकीय अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या मार्गदर्शन सूचनांचे स्वागत संत आणि स्थानिक लोकांनी केले आहे. कुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांनी भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन संतांनी केले आहे.
अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांना नोंदणी आणि वैद्यकीय अहवाल बंधनकारक करण्यात आला होता. यानंतर आता कुंभ मेळ्यात सहभागी भक्तांनादेखील नोंदणी आणि वैद्यकीय अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आता भक्तांना नोंदणीसह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावे लागणार आहे.
केंद्र सरकारच्या या नियमावलीचे पालन स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावलीचे समर्थन स्थानिकांनी केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे कुंभमेळ्यात जास्त गर्दी होणार नाही, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
काय आहे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावलीत
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये, कुंभ मेळ्यात सहभागी प्रत्येकाला मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकार भक्तांना स्वस्त दरात मास्क उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय कुंभ मेळ्यात वारंवार हात धुणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप इन्टॉल करावे लागणार आहे. तसेच कुंभ मेळाच्या परिसरात थुंकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रत्येकाला शारिरीक अंतर राखावे लागेल.
दरम्यान, उत्तराखंड सरकारने ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि १० वर्षाखालील मुलांना कुंभ मेळाव्यात सहभागी होण्याची परवानगी दिलेली नाही.