रतलाम (मध्य प्रदेश) - रतलाममध्ये प्रशासनाला न सांगताच एका कोरोनाबाधित मृताचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांसह अंत्यविधीत सामील झालेल्या 28 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर 30 जणांचा शोध सुरू आहे. तर, मृताच्या कुटुंबातील 9 जणआंना मेडीकल कॉलेजमध्ये आयसोलेशन वॉर्डात ठेवले आहे.
लोहार रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 4 एप्रिलला इंदूरच्या एमवाय रुग्णालयात मृत्यू झाला. यावेळी मृताचा कोरोना अहवाल प्राप्त झाला नव्हता. मात्र, नातेवाईकांनी प्रशासनाला माहिती न देताच मृतदेह रतलाममध्ये आणून अंत्यविधी उरकला. यानंतर मृत व्यक्तीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर खळबळ उडाली.
प्रशासनाने मृताच्या कुटुंबातील 9 जणांना मेडीकल कॉलेजमध्ये आयसोलेट केले आहे. तसेच लोहार रोड परिसर सील करून कंटोनमेंट क्षेत्र घोषित केले आहे. या संपूर्ण प्रकरणात रुग्णालय प्रशासनाची चूक असल्याचेदेखील समोर येत आहे. कोरोनाचा रिपोर्ट आल्याशिवाय त्यांनी कुटुंबीयांना मृतदेह कसा सोपवला, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.