नवी दिल्ली - भाजपच्या एका प्रतिनिधी मंडळाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाला कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात असंसदीय भाषेचा उपयोग केला, असा आरोप त्यांनी लावला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात असंसदीय भाषेचा उपयोग करून सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ते काँग्रेसच्या 'गाली गँग'चे प्रमुख आहेत. त्यांनी विविध वेळी मोदी विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कारवाई व्हावी, ही भाजपची इच्छा आहे, असे सीतारमण यांचे म्हणणे आहे.
राहुल गांधी मागील काही महिन्यांपासून 'चौकीदार चोर है' असे मोदी विरोधात विधान करत आहेत. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक वेळा हे विधान केले. सामान्यता ते मोदी यांना राफेल प्रकरणावरुन असे म्हणत असतात. भाजप त्यांच्या याच वक्तव्यामुळे नाराज आहे. त्यावरुन त्यांना 'मैं भी चौकीदार' ही मोहीम राबवली. आपण अपशब्दांना अलंकार म्हणून परिधान करतो, असेही स्वतः मोदी यांनी म्हटले आहे.
भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनीही राहुल गांधी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालायामध्ये अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालय त्यांच्या या याचिकेवर १५ एप्रिलला सुनावणी करेल. राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' या विधानाला सर्वोच्च न्यायालयाचेच विधान असल्यासारखे प्रसिद्ध केले, असा त्यांचा आरोप आहे.