पाटणा - भारत-चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये बिहारमधील एका सुपुत्राला वीरमरण आले आहे. सुनील कुमार असे त्यांचे नाव असून ते बिहार रेजिमेंटच्या १६व्या तुकडीचे जवान होते.
वीरमरण आलेले जवान सारण जिल्ह्यातील पारसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढीब्रा गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि ३ वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. तसेच गावावर शोककळा पसरली. मात्र, त्यांना देशासाठी वीरमरण आल्याने सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमके काय घडले?
चीनच्या सैन्याने सोमवारी लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलनजीक (एलएसी) तात्पुरते काही निशाण उभे केले. त्यानंतर आपल्या सैनिकांनी ते सर्व निशाण खाली उतरवले. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटापट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.
या झटापटीमध्ये भारताच्या कर्नलसह २० जवानांना वीरमरण आले. तसेच चीनी सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे बोलले जात आहे.