पाटणा - बिहार विधानसभेने आज (मंगळवार) नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात (एनआरसी) ठराव मंजूर केला आहे. यासोबतच विधानसभेने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये (एनपीआर) सुधारणा करत, ती २०१० सालच्या पद्धतीने राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एनपीआरच्या फॉर्ममधून 'कंटेन्टियस क्लॉज' वगळण्यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेमध्ये दिली.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतरांनी विधानसभा तहकूब करण्याची मागणी केली होती. यावेळी प्रत्युत्तर देत नितीश कुमार यांनी सांगितले, की राज्यामध्ये एनपीआर कोणत्या पद्धतीने लागू होईल याबाबत कोणताही गोँधळ होऊ नये. तसेच, कोणालाही त्याच्या आई-वडिलांचे जन्मस्थान वगैरे माहिती सांगायला लागू नये.
यासोबतच केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रामध्ये बिहार सरकारने अशी मागणी केली आहे, की लिंगांतर स्तंभात "ट्रान्सजेंडर्स" हा स्तंभ समाविष्ट करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.