भोपाळ - वडिलांनी ल्युडो खेळात अनेकदा पराभव केल्यावरून एका 24 वर्षीय तरुणीने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली, असे कौटुंबिक न्यायालय सल्लागार सरिता रजनी यांनी सांगितले. 'हल्ली मुले पराभव पचवू शकत नाहीत आणि म्हणूनच अशी प्रकरणे समोर येतात. त्यांनी पराभवाचा स्वीकार करायला शिकणे आवश्यक आहे. जिंकणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पराभवही महत्त्वाचा आहे,' रजनी म्हणाल्या.
लॉकडाऊन कालावधीत ही तरुणी, तिची दोन भावंडे आणि त्यांचे वडील बोर्ड गेम खेळायचे. वडिलांनी एकदा खेळात हरवल्यानंतर, तरुणीच्या मनात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली, जी कालांतराने वाढत गेली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुटुंबाला समुपदेशन सत्र घ्यावे लागत आहे.
'एक 24 वर्षीय युवती आमच्याकडे आली होती आणि ती म्हणाली, जेव्हा ती आपल्या बहिणी आणि वडिलांसोबत लुडो खेळत होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिची सोंगटी मारली. त्या वेळी, तिच्या विश्वासाचा भंग झाल्यासारखे तिला वाटत होते. तिने सांगितले की, तिने वडिलांवर खूप विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडून पराभूत होऊ, असे तिला कधी वाटलेही नव्हते,' असे रजनी यांनी सांगितले.
हेही वाचा - राजकारणात कुणी मित्र किंवा शत्रू नसतो - गुलाबराव पाटील
'यानंतरही तिच्या वडिलांनी तिला बर्याच वेळा पराभूत केले. यातून तिचा राग अधिकच वाढला आणि तिने त्यांना 'पिता' म्हणून संबोधणे थांबवले. आतापर्यंत या प्रकरणी तिचे चार वेळा समुपदेशन झाले आहे आणि परिस्थिती सुधारत असल्याचे रजनी म्हणाल्या.
'माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात. पण त्यांचे खरोखरच माझ्यावर प्रेम असेल, तर त्यांनी मला खेळात का पराभूत केले? माझ्या वडिलांनी माझ्यावरील प्रेमाखातर हा खेळ स्वतःहून गमावला असता. या खेळात वडिलांनी माझी सोंगटी एकदा नव्हे तर, 7 वेळी मारली. जेव्हा जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा माझा राग अधिकच तीव्र झाला,' असे या तरुणीने म्हटल्याचे रजनी यांनी सांगितले.
रजनी म्हणाल्या की, 'मुलीने आपल्या कुटुंबीयांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. मात्र, याबाबत समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला. सध्या ही युवती अभ्यासाकडे स्वतःचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असून, हे कुटुंब भोपाळ शहरात राहते. या मुलीला आई नाही आणि ती तीन भावंडांपैकी सर्वात धाकटी आहे,' असे रजनी यांनी सांगितले.
'सर्वांना आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून जास्त अपेक्षा असतात आणि थोडीशी कमतरता राहिली तर, यामुळे तणाव निर्माण होतो. आजकाल मुले पराभव पचवू शकत नाहीत,' असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - अंजूमनच्या 'या' ग्रंथालयात आहे, उर्दूतील सर्वात दुर्मिळ 'वाल्मिकी रामायण'