नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेला लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर, कारखाने तर सुरू झाले मात्र काही राज्यांनी कामगार कायद्यामध्येच आपल्या सोईने बदल करुन घेतले. या बदलांचा भारतीय मजदूर संघाने निषेध केला आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशभरातील कित्येक कामगारांना पुन्हा कामावर जाण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, लॉकडाऊन काळात रखडलेली कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी या कामगारांच्या कामाचे तास वाढवण्याची तरतूद काही राज्यांनी करुन घेतली. यामुळे कित्येक कामगारांच्या कामाची वेळ, आहे त्या वेतनामध्येच आठ तासांवरुन १२ तासांवर गेली. याबाबत स्पष्टीकरण देताना उत्तर प्रदेश सरकारने म्हटले होते, की नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी कामगार कायद्यामध्ये असा बदल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशसोबतच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात आले होते. तर राजस्थान, महाराष्ट्र, गोवा आणि ओडिशामध्ये कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि केरळने आपण असे काही करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा : टाळेबंदीमुळे अडकली मोक्षप्राप्ती, स्मशानभूमीतील अस्थी लॉकर 'हाउसफुल्ल'