जगदलपूर - कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घेतलेल असताना लोकांमधील भीती देखील वढली आहे. याचाच प्रत्यय जगदलपूर येथे आलाय. सुकमा जिल्ह्यात युनिफेब इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीत सुपरवाजर पदावर कार्यरत असणाऱ्या रंधीर कुमार यांची किडनी फेल झाली. तसेच अन्य काही शारीरिक व्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, लॉकडाऊन असल्याने संबंधित मृतदेह प्रशासनाला त्यांचा गावी पाठवण्यास शक्य नव्हते. तसेच नातेवाईक घरात अडकल्याने त्यांना देखील अंत्यविधीला उपस्थित राहणे शक्य नव्हते. अखेर बस्तरच्या पोलिसांनीच पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडले.
रंधिर कुमार बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रुपसपूर येथील रहिवासी आहे. ते मागील दोन वर्षांपासून नोकरीसाठी बस्तरमध्ये स्थलांतरीत झाले होते. 16 एप्रिलला अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जगदलपूरच्या डिमरापाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुन्हा शहरानजीकच्या एका रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, या ठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
'लाईव्ह' अंत्यसंस्कार
रंधिरच्या मित्रपरिवाराने मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबीयांना दिली. मात्र, संचारबंदीमुळे त्यांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बाहेर पडता आले नाही. यामुळे बस्तर पोलिसांनी शहरातील मुक्तीधाममध्ये त्यांचे अंत्यसंस्कार विधी पार पाडले. तसेच व्हिडिओ कॉलमार्फत नातेवाईकांनी या अंत्यविधीला उपस्थिती लावली.
पोलीस करणार अस्थींचे जतन
जगदलपूरचे मुख्य पोलीस अधीक्षक हेमसागर सिदार यांनी मृताला मुखाग्नी दिला. त्यांच्या अस्थी पोलीस सुरक्षीत ठेवणार असून लॉकडाऊन संपल्यानंतर त्या कुटुंबीयांना सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासन आणि कंपनी ठेकेदार यांच्याकडून नातेवाईकांना आवश्यक मदत पोहोचवण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.