नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी ५९ चीनी अॅप्सना बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूमधील काँग्रेस खासदार माणिक्यम टागोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान केले आहे, की त्यांनी पेटीएम या अॅपवरही बंदी घालून दाखवावी. पेटीएम हे ई-कॉमर्स अॅप आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिनी गुंतवणूक आहे.
चीनसोबत झालेल्या झटापटीमध्ये आपले २० जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच जवळपास ५० स्क्वेअर किलोमीटरची आपली जमीन चीनने ताब्यात घेतली आहे. आता मोदी सरकारने या ५९ चिनी अॅप्सवर बंदी लागू केली आहे. आम्हाला अपेक्षा होती की पंतप्रधान याहून मोठा निर्णय घेतील. मात्र, सरकारला जर चीनला तोंड देण्याचा हा योग्य मार्ग वाटत असेल तर मग त्यांनी पेटीएम अॅपवरही बंदी आणावी, असे टागोर यांनी म्हटले आहे. ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
सरकारने आपला निर्णय जाहीर करताच, खासदार टागोर यांनी विकीपीडिया पेजचा स्क्रीनशॉट पोस्ट केला, ज्यामध्ये 'पेटीएम'मध्ये अँट फायनॅन्शिअल्स आणि अलिबाबा ग्रुप या चीनी कंपन्यांचे अनुक्रमे २९.७१ आणि ७.१८ टक्के गुंतवणूक असल्याची माहिती दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात चिनी गुंतवणूक असलेले अॅप बंद करण्याचे धाडस पंतप्रधान मोदी दाखवतील का? असा प्रश्न टागोर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, २० जवानांच्या जाण्यामुळे झालेली जखम ही टिकटॉकसारखे अॅप्स बॅन करुन भरुन निघणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : अनलॉक २.०ची घोषणा, गरीब कल्याण योजनेचा दिला हिशेब; चीनबाबत मौनच!