नवी दिल्ली - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. वायुसेनाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांच्या साह्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैश-ए- मोहम्मदच्या बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फरबाद या ३ अल्फा कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असल्याचे एका वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले आहे. याआधी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान कारवाईबाबतची विस्तृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.